लवण वज्र: कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचा प्रयोग
Posted by Sandeep Shelke on 2nd September 2012
पावसाच्या अभावामुळे महाराष्ट्राचा खूप मोठा प्रदेश टंचाईसदृश्य परिस्थितीला समोर जातोय. अशातच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी समुदायाचा आणि जनावरांचा. म्हणून डॉ. श्री. राजा मराठे यांच्या लवण वज्र (स्रोत) प्रयोगावरून प्रेरित होऊन आम्ही आमच्या गावात सुद्धा कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचा प्रयोग करायचे योजून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य गाठायचे ठरविले.
त्यासाठी खालील गोष्टींची तयारी केली:
१. जाळण्याचे लाकडे ५ मन (२०० किलो)
२. दगडी(मोठे) मीठ १ मन (४० किलो)
३. घासलेट/केरोसीन/डीझेल १ लिटर
४. वापरलेले टायर जीप/मिनी-डूअरचे ४-५
आणि नैसर्गिकरित्या वातावरणाच्या तयारीची अपेक्षा ठेवली:
१. पावसाचे ढग येण्याची
२. आर्द्रता/हवेतील ओलावा मोठ्या प्रमाणावर होण्याची
३. वाऱ्याचा वेग मंद राहण्याची
प्रयोगाची जागा डोंगर पायथ्याशी निवडली कारण वाऱ्याला ऊर्ध्व प्रवाह प्राप्त होतो तसेच वाऱ्याचा वेगसुद्धा मर्यादित असतो. प्रयोग करण्यासाठी सूर्योदयाच्या मध्यान्हाच्या आणि सूर्यास्ताच्या आसपास १-१.३० तासाचा वेळ चांगला असतो कारण त्यावेळेस वाऱ्याचा वेग कमी असतो. ह्यापैकी ज्या वेळी वर सांगितल्या प्रमाणे वातावरण निर्मिती होईल त्या वेळी वर नमूद केलेल्या साधानंनिशी प्रयोगास खालील प्रमाणे सुरुवात करावी. आम्ही प्रयोग करताना तिन्ही वेळी मध्यान्हाच्या नंतरचीच वेळ निवडली कारण त्याच वेळी वातावरण थोड्या बहुत प्रमाणात अनुकूल मिळाले.
आम्ही सुरुवातीला आग पेटविली आणि आणि त्यामध्येच आग वाढविण्यासाठी एक टायर टाकले. आगीची तीव्रता वाढण्याची वाट पहिली म्हणजेच तापमान ३०० अंशांच्या वर जाण्याची कारण मीठ विरघळण्यासाठी तेवढ्या तापमानाची आवश्यकता असते. ढोबळमानाने जेव्हा वाटले कि आगीचे तापमान वाढले तेव्हा थोडेसे मीठ टाकून परीक्षा घेतली. हळूहळू आगीची तीव्रता वाढली आणि आम्ही एका-एकाने आली पळीने मिठाचा शिडकाव करायला सुरुवात केली. हा प्रयोग असाच जवळपास ९०-१०० मिनिटे चालला (ह्याच्या आधीचा एका छोटा प्रयोग कुठल्याही तयारीशिवाय १५-२० मिनिटांसाठी केला होता आणि त्याला चांगले यश मिळाले, पण त्यावेळेचे वातावरण खूपच पोषक होते किंतु वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे सगळे पाण्याचे ढग पटापट पुढे सरकले). ह्या प्रयोगाला पण यश मिळाले परंतु खूपच कमी प्रमाणात, कारण पावसाचे आगमन फार थोड्या क्षेत्रावर आणि प्रमाणावर झाले.
प्रयोगाचे निवडक छायाचित्रे:
ह्या नंतर आम्ही अजून एक प्रयोग केला आणि तो सुद्धा तुरळक सारी देऊन गेला. ह्या सर्व प्रयोगाचे फलित म्हणजे आम्हाला हा विश्वास मिळाला कि अशा रीतीने पाऊस पडू शकतो आणि जर अजून शास्त्रीय पद्धतीने केले तर यशही मोठ्या प्रमाणावर मिळेल.
ह्या चालू महिन्यात देखील एक प्रयोग शास्त्रीय पद्धतीने आणि अनुभवी लोकांच्या सहाय्याने करायचा मानस आहे.
जय भारत!
Tags: artificial rain, Language, lavan vajra, कृत्रिम पाऊस, लवण वज्र
Posted in मराठी, शेती | No Comments »