कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Categories

  • Google Ad

ऐल तटावर पैल तटावर

Posted by Sandeep Shelke on 11th September 2011

ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊनLarge Blog Image
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळया डोहाकडे

झाकळूनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकु नी जलात बसला असला औदुंबर

– बालकवी (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

Tags: , , , , ,
Posted in कविता, भारत, मराठी | 4 Comments »

श्रावणमासी हर्षमानसी

Posted by Sandeep Shelke on 12th August 2011

श्रावण मास

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

-बालकवी (श्री. त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

Tags: , , , , , , , ,
Posted in कविता, भारत, मराठी | 5 Comments »

 
%d bloggers like this: