कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

  • Social

  • Categories

  • Google Ad

पोरा संग बसून नका काढू फोटू

Posted by Sandeep Shelke on January 13th, 2015

प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली. विधानसभेत सिन्नरचे आमदार झोरे आणि विधान परिषदेत आमदार जयंत जाधव यांनी वाचून दाखविली.
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची मुले आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान करणार्‍या संवेदनशील नागरिकांनी ही पोस्ट शेअर केली म्हणून विधिमंडळात पोहोचली.

Borgen magazine

Borgen magazine

मेला माझा नवरा जरी
मला नका भेटू.
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू…

लाल दिव्याच्या गाडीतून
येईल तुमचा ताफा..
कॅमेर्‍यात बघून बघून
मारल्या जातील थापा..

पांढरा धोट रुमाल काढून
डोळेसुद्धा पुसाल..
पोरक्या माझ्या पोरांना
खेटून खेटून बसाल..

खोटाखोटा कंठ तुमचा
नका देऊ दाटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी माझं गुणाचं
शेतामधी खपायचं..
अर्ध्या पोटी राहून सुद्धा
इभ्रतीला जपायचं..

काळ्या माईची वटीभराया
कर्ज थोडं काढलं..
पीक गेलं जळून पण
कर्ज मात्र वाढलं..

सावकार लागला छळू
तवा धीर लागला सुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

पोरगं जातय साळात
त्याची फीस नाही भरायला..
जनावरं दारात उभी
चारा नाही चारायला..

विहीर कधीच आटून गेली
बोरला नाही पाणी..
करपलेल्या पिकाकडं
पाहत राहायचं धनी..

सरकार झालय कोडगं
अन सावकार लागलेत लुटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू…

रातच्याला जवळ घेऊन
लई गोड बोललं..
डोळ्यांत दिसलं पाणी
तवा काळीज माझं हलल..

जाग आली पाहटं तवा
जवळ नाही दिसलं..
फंख्याला फाशी घेऊन
कुंक माझं पुसलं..

खोटे अश्रू डोळ्यात आणून
आता नका चुटपूटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

धनी होतं तवा कुणी
धीर नाही दिला..
आता किती तातडीने
पंचनामा बी केला..

कॅमेरे घेऊन पांढर्‍या गाड्या
आल्या दारामंदी..
आभाळ फाटलंय आमच
यांना प्रसिद्धीची संधी..

म्हणे जग लई सुधारलय
परं माणुसकी लागलीय आटू..
माझ्या पोरा संग बसून
नका काढू फोटू..

होईल घोषणा पॅकेजची
मदतीचा चेक येईल..
माझ्या लेकरांचा बाप
कोण आणून देईल..

धनी जरी गेलं तरी
मी न्हाई हारायची..
पोरांना करून पोरकं
मी न्हाई मरायची..

तुमचं मात्र थांबवा ढोंग
मला नका भेटू..
माझ्या
पोरा संग बसून
नका काढू फोटू….

– प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ कीर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर

स्रोत- राजू परुळेकर यांच्या फेसबुक पानावरून

संबंधित: Why Farmers Commit suicide मेरे बच्चों के साथ बैठकर फोटो मत निकालना

One Response to “पोरा संग बसून नका काढू फोटू”

  1. NITIN NIKAM Says:

    एक वास्तववादी सत्य जे A/C ऑफिस मध्ये बसून कधीच कळणार नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीचे गोडवे गाऊन पानभर जाहिरात देताना- थोडा तरी विचार करायलाच पाहिजे की महाराष्ट्र किती पुढे गेला आहे. अर्थकारणाचा पायाच डळमळीत असेल तर ० ते ९ आकड्यांचा खेळ मांडूच नका, पायाभूत सुविधा दिल्यात
    तरच, राष्ट्र महा राहील नाहीतर………. कल्पनाही करू नका संकटांची…..
    श्री . ह. भ. प. श्यामसुंदर यांचे मनापासून आभार की त्यांनी ही वेदना शब्दात मांडली आणि महाराष्ट्रा पर्यंत पोहचवली.

    नितीन निकम
    किसानवाडी – मासिक ( शेतकऱ्यांच हक्काच व्यासपीठ ) – नाशिक
    ९७६२६८५४९९

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: