कृषी देश

एक विचार, एक प्रवास!!

 • Categories

 • Google Ad

श्रावणमासी हर्षमानसी

Posted by Sandeep Shelke on August 12th, 2011

श्रावण मास

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

-बालकवी (श्री. त्र्यंबक बापुजी ठोंबरे)

5 Responses to “श्रावणमासी हर्षमानसी”

 1. Sarika Says:

  नमस्कार,

  हि वेब साeट फारच छान आहे. परंतु मला यात बाल कवींची श्रावण मासी हि कविता सापडली नाही. जर ती कुणी छान लयबद्ध ने म्हटली असेल तर जरूर मला एमैल करा अथवा लिंक पाठवा.

 2. संदीप नारायण शेळके Says:

  Namaste Sarika,

  Bhet dilyabaddal abhari aahe.
  Mala ajunahi tashi kavita sapadali nahi. Sapadalyas nakki pathavel.

  Jay Bharat!

 3. Hemant Gothoskar Says:

  can someone explain meaning of पुरोपकंठी शुध्दमती

  I shall be grateful

 4. Sandeep Shelke Says:

  बालकवी यांच्यावर हा छानसा कार्यक्रम.

 5. Sandeep Shelke Says:

  सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

  म्हणजे,

  शुद्ध मनाच्या सुंदर मुली हातामध्ये सुंदर परडी घेऊन गावकुसावर रम्य फुल-बागांमध्ये फुले वेचत(खुडत) आहेत.

  ह्या संकेतस्थळावर माहिती मिळाली http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=7740&page=२, तसेच रघु वंश या पुस्तकात एक उल्लेख आढळला.

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

 
%d bloggers like this: